पाचोरा: दर महिन्याच्या १२ तारखेला वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथे नियमित मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित केले जाते. याच उपक्रमांतर्गत १२ डिसेंबर रोजी मोतीबिंदू तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांची तपासणी करण्यात आली. वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “गेल्या दोन वर्षांपासून नारायणराव मोहनराव नेत्रालय, नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे नियमितपणे आयोजित करत आहोत. आतापर्यंत साधारणतः ७,००० लोकांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली आहे, तर १,२०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.” डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले की, “वयस्कर लोकांमध्ये मोतीबिंदूचा त्रास सामान्यतः अधिक प्रमाणात दिसून येतो. परंतु, अनेक वेळा योग्य माहिती अभावी किंवा आर्थिक अडचणींमुळे हे रुग्ण उपचार घेऊ शकत नाहीत. आमच्या शिबिरांचा उद्देश गरजू लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवणे हा आहे. मोतीबिंदूची वेळेत तपासणी आणि शस्त्रक्रिया झाल्यास रुग्णांचे दृष्टीदोष दूर होऊ शकतात आणि त्यांचा जीवनमान सुधारतो.” शिबिराच्या यशस्वितेसाठी वृंदावन हॉस्पिटल आणि नारायणराव मोहनराव नेत्रालय यांचे वैद्यकीय कर्मचारी, तांत्रिक तज्ज्ञ, तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात आलेल्या रुग्णांना मोफत तपासणी, सल्ला, तसेच शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचार पद्धतींची माहिती देण्यात आली. डॉ. पाटील यांनी शेवटी जनतेला आवाहन केले की, “आपल्या परिसरातील गरजू वयस्कर माता-भगिनींना या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करा. दर महिन्याच्या १२ तारखेला होणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त लोकांना पाठवावे, जेणेकरून त्यांच्या दृष्टीसमस्येचे समाधान करता येईल.” मोतीबिंदू तपासणी शिबिराच्या माध्यमातून सुलभ आणि परवडणाऱ्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा वृंदावन हॉस्पिटलचा उपक्रम सामाजिक बांधिलकीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
पाचोरा – शहरात आधुनिक दंतचिकित्सा सुविधांनी सुसज्ज महाजन मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल सुरू होत आहे. डॉ. पराग गोविंद महाजन यांच्या पुढाकाराने साकारलेले हे दवाखाने दंतचिकित्सेत नावीन्यपूर्ण सेवा पुरविण्यास सज्ज आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ रविवार, दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळा शुभारंभ शुभहस्ते: डॉ. विश्वराज हनुमंतराव निकम (फलटण) – Oral & Maxillofacial Surgeon & Cosmetologist. डॉ. इम्रान शेख (पुणे) – Gold Member, 3D Cleaning Project. प्रमुख अतिथी: -मा. आप्पासो. किशोर धनसिंग पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव. मा. भाऊसो. अमोल पंडीतराव शिंदे, भाजपा नेते. मा. श्री. सचिन दादा सोमवंशी, तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस. मा. भाऊसो. अनिल रामदास महाजन, माजी सभापती, पंचायत समिती डोल. मा. श्री. दिलीप ऑकार वाघ, माजी आमदार. मा. सौ. वैशाली नरेंद्र सूर्यवंशी, संचालिका, निर्मल सीड, पाचोरा. मा. श्री. दादासो. प्रकाश बाजीराव पाटील, निवृत्त आयुक्त, विक्रीकर विभाग. शुभारंभ सोहळ्याला स्थानिक डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स्थळ: सावित्री नगर, एसएसएमएम महाविद्यालयाजवळ, भडगाव रोड, पाचोरा. महाजन मल्टी स्पेशलिटी डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ. पराग महाजन यांचा थोडक्यात परिचय डॉ. पराग गोविंद महाजन हे अत्यंत कुशल आणि अनुभवी दंतचिकित्सक असून त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथील ग्रामविकास विद्यालयात झाले. नवोदय परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी भुसावळ नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी संगमनेर येथे त्यांनी B.D.S. (MUHS) अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तज्ज्ञ म्हणून नाव कमावले. दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी बाबत डॉक्टर पराग माझे यांनी काही खास टिप्स पुढील प्रमाणे नमूद केलेल्या आहेत सुंदर आणि निरोगी दात हे आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक आहेत. यासाठी काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे: 1. दिवसातून दोन वेळा ब्रश करा: सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे दातांसाठी आवश्यक आहे. 2. माऊथवॉशचा वापर करा: तोंडातील दुर्गंधी आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी माऊथवॉश उपयोगी ठरतो. 3. जिभेची स्वच्छता: जिभेवर साचलेल्या जीवाणूंमुळे दुर्गंधी येते. त्यामुळे जिभेची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. 4. फ्लॉसचा वापर करा: दर आठवड्याला ३-४ वेळा फ्लॉसचा वापर केल्यास दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढले जाऊ शकतात. 5. धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ टाळा: या सवयींमुळे दातांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 6. पाणी व प्रथिनेयुक्त आहार: हिरड्यांच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी प्या आणि पोषक आहार घ्या. 7. जेवणानंतर तोंड धुवा: अन्नकण तोंडात राहू नयेत म्हणून प्रत्येक जेवणानंतर चुळ भरून तोंड स्वच्छ करा. 8. डेंटिस्टकडे नियमित तपासणी करा: दर सहा महिन्यांनी दंतचिकित्सकांकडे तपासणी करणे गरजेचे आहे. महाजन डेंटल हॉस्पिटलची वैशिष्ट्ये महाजन मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार सेवा दिली जाईल. येथे दातांचे सर्व प्रकारचे उपचार आणि सल्लामसलत उपलब्ध आहे. स्थानिक रहिवाशांसाठी ही सुविधा दंतआरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल. Mo. 90962 97065. पत्ता: सावित्री नगर, एसएसएमएम महाविद्यालयाजवळ, भडगाव रोड, पाचोरा. तरी नातेवाईक , स्नेही ,आप्तेष्ठ , हितचिंतकांसह या सर्व जनतेने या शुभारंभ सोहळ्याला हजेरी लावून शुभेच्छापर आशिर्वाद द्यावे व वेळो वेळी रुग्णांनी आधुनिक आणि दर्जेदार दंतचिकित्सेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पाचोरा – तालुक्यातील खडकदेवळा बु .येथील निसर्ग ऍग्रो एजन्सी या कृषी निविष्क्षा केंद्रातून विक्रीस असलेल्या रासायनिक खतांबाबत शेतकऱ्यांनी गंभीर स्वरूपाची तक्रार नोंदवली. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आर. एन. जाधव आणि तंत्र अधिकारी एस. व्ही. कनाड यांनी तक्रारदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सदर खत विक्री केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान शेतकऱ्यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या रासायनिक खतांचे दोन नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी दरम्यान काही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित विक्रेत्याला नोटीस बजावण्यात आली असून, सदर साठवण व विक्री केंद्रावर विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली नाही, तर परवान्यावर पुढील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आर. एन. जाधव यांनी दिली. शेतकऱ्यांच्या समाधानासाठी कृषी विभाग सजग शेतकऱ्यांकडून नोंदवण्यात आलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत कृषी विभागाने संबंधित विक्रेत्यावर कारवाई केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि गुणवत्तायुक्त कृषी निविष्क्षा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग सतर्क असल्याचे दिसून आले आहे. संबंधित प्रकरणात तपासणी दरम्यान तक्रारीतील मुद्दे आणि विक्री केंद्राच्या व्यवस्थापनात आढळलेल्या त्रुटी याबाबत सविस्तर तपशील मिळवण्यासाठी कृषी विभागाने कार्यवाही सुरू ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे आणि परिणामकारक रासायनिक खते मिळावीत यासाठी कृषी विभागाकडून नियम व अटींचे काटेकोर पालन करण्यास प्राधान्य दिले जात आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना या कारवाईनंतर शेतकरी वर्गातून कृषी विभागाच्या तातडीच्या हस्तक्षेपाचे स्वागत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. संबंधित तपासणी आणि पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा असताना कृषी विभागाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर राहावे, अशी भावना शेतकरी समुदायामध्ये व्यक्त केली जात आहे. या संदर्भात संबधित विक्रेत्याने स्पष्ट सांगितले माझ्या कृषी केंद्रावर सर्व राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त कंपन्यांचा & अधिकृत बिलींग मध्ये माल असतो तो देखील उत्तम दर्जाचा आहे कुठेही तपासणी केली तरी त्या चौकशी व तपासणीला केव्हाही जाण्यास तयार आहे कर नाही तर डर कशाला
हिंदू धर्मशास्त्रात प्रत्येक महिन्याला त्याचे स्वतःचे आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यातही मार्गशीर्ष महिना विशेष स्थान राखतो. “मार्गशीर्षोऽहम् मासानाम्” असे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हा महिना धार्मिक आचरण, साधना आणि भक्तीचा पर्वकाळ मानला जातो. मार्गशीर्ष महिना केवळ धार्मिक विधींसाठीच नव्हे, तर अध्यात्मिक प्रगतीसाठीही महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात दत्त जयंती आणि श्री दत्तात्रेयांच्या पारायणाला विशेष महत्त्व आहे.
दत्तात्रेयांची महती
भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे संयुक्त रूप मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या साक्षात अवताररूपाने दत्तात्रेयांना ओळखले जाते. दत्तात्रेय हे ज्ञान, योग, भक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून आत्मज्ञान, साधना आणि सर्वव्यापकतेचा संदेश दिला जातो.
दत्त जयंतीचे महत्त्व
दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते. ही पौर्णिमा भक्तांसाठी विशेष साधनेचा दिवस असतो. श्री दत्तात्रेयांचा जन्म या दिवशी झाल्याने या दिवसाचे अत्यंत महत्त्व आहे. दत्त जयंतीच्या दिवशी भक्त विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि उपवास करतात. यामध्ये दत्तगुरूंच्या कथा ऐकणे, श्री दत्तात्रेयांच्या नामस्मरणाने स्वतःला शुद्ध करणे, आणि सामूहिक भजनातून भक्तीरसात तल्लीन होणे या गोष्टी प्राधान्याने केल्या जातात.
पारायणाचे महत्त्व
पारायण म्हणजे धार्मिक ग्रंथांचे पठन किंवा ऐकणे. मार्गशीर्ष महिन्यात दत्तपुराण, गुरुचरित्र आणि इतर धार्मिक ग्रंथांचे पारायण करण्याला विशेष महत्त्व आहे. गुरुचरित्राचे पारायण दत्त उपासनेतील प्रमुख घटक आहे. या पारायणातून भक्तांना जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते.गुरुचरित्राचे पारायण केवळ अध्यात्मिक प्रगतीसाठीच नव्हे, तर मानसिक शांती आणि जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठीही केले जाते. पारायणाच्या माध्यमातून साधकांमध्ये सकारात्मक बदल होतो, कर्मयोग आणि भक्ति योगाचा संदेश रुजतो.
मार्गशीर्ष महिन्यातील विशेषता
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जाते. हा काळ निसर्गात संतुलन साधण्याचा आहे. धार्मिक आचरणामध्येही हा महिना अधिक महत्त्वाचा आहे.मार्गशीर्ष महिन्यातील थंडी वातावरणाला प्रसन्न करते. या ऋतूमुळे मनाला शांतता लाभते. या कालावधीत केलेली साधना अधिक फलदायी मानली जाते. या महिन्यात दत्त जयंतीच्या निमित्ताने सामूहिक पूजाअर्चा आणि भजन-कीर्तनाचा आनंद भक्तांना लाभतो.
धार्मिक परंपरेचा संवर्धन
मार्गशीर्ष महिन्यात पारायण करण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. ही परंपरा केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित नाही, तर ती सांस्कृतिक वारसा जपण्याचे साधनही आहे. गुरुचरित्रातील कथा केवळ अध्यात्मिक शिक्षण देत नाहीत, तर समाजात नैतिकता, समर्पण आणि एकोपा यांचे महत्त्वही पटवून देतात.
आधुनिक जीवनात मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंतीचे महत्त्व
आजच्या धावपळीच्या युगात, अध्यात्मिक साधना आणि परंपरा जपणे अधिक महत्त्वाचे ठरते. मार्गशीर्ष महिन्यातील पारायण आणि दत्त जयंती हे भक्तांना त्यांच्या जीवनात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणा देतात. दत्तगुरूंच्या उपदेशातून कुटुंबात सुख-शांती, समाजात एकोपा, आणि व्यक्तीमत्वात संयम व साधनेचा गुण विकसित होतो.दत्त जयंतीचा उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर आत्मशुद्धीचा पर्वकाळ आहे. या दिवशी नामस्मरण, जप आणि ध्यानाच्या माध्यमातून जीवनात सकारात्मकता आणण्याचा संकल्प करता येतो.
उपसंहार
मार्गशीर्ष महिना, दत्त जयंती आणि पारायणाचा हा त्रिवेणी संगम भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. या काळात धार्मिक साधनेमुळे अध्यात्मिक उन्नती साधता येते. मार्गशीर्ष महिना मानवाला जीवनाचे उच्च उद्दीष्ट प्राप्त करण्याचा मार्ग दाखवतो. दत्त जयंतीचा सोहळा आणि गुरुचरित्राचे पारायण हा प्रत्येक भक्तासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणांचा स्त्रोत आहे.अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्याचा योग्य प्रकारे उपयोग करून आत्मोन्नती साधणे, हीच खरी श्रद्धा आणि भक्तीची परिपूर्णता आहे.
काल पर्वा सहज ओळखीतीलबाल पणा पासुन एकत्रीत राहीलेल्या परंतु आता अति उच्च पदावर असलेल्या मित्राला एक किरकोळ काम सांगण्याचा योग आला काम इतके सहज होते की आपल्या शिपायाला सांगून सदरचा कागद त्याच्या कार्यालयाच्या जवळीलच संबंधित ठिकाणी पोचवायचा होता परंतु एवढा कटू अनुभव पहिल्यांदाच अनुभवास आला कटू आहेत पण मनातील काही शब्द कागदावर मांडावे लागत आहे
पद, पैसा आणि यश मिळाल्यावर अनेकजण स्वतःचा भूतकाळ आणि जुने नातेवाईक & मित्र विसरतात. आजच्या स्पर्धात्मक जगात, यशाचे मोजमाप पैसा आणि पद , प्रतिष्ठेवरच केले जाते, त्यामुळे कदाचित काहींना वाटते की आता जुन्या संबंधांना महत्त्व नाही. परंतु, हा विचार केवळ त्यांच्या संकुचित वृत्तीचे दर्शन घडवतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो, तेव्हा अनेक लोक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात – कधी मित्र, कधी कुटुंबीय, कधी मार्गदर्शक. यश मिळवताना या सर्वांचा आधार घेऊनच ती व्यक्ती प्रगती करते. पण एकदा का यशाच्या शिखरावर पोहोचले की काही लोक “आता मला कोणीच लागत नाही,” असा अति आत्मविश्वास ठेवतात. भूतकाळातील संघर्ष आणि त्या संघर्षांत साथ देणाऱ्या व्यक्तींना विसरून जाणे हे केवळ दुर्दैव नाही, तर हे व्यक्तिमत्त्वाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. विसरलेला भूतकाळ – का? अशा लोकांची वृत्ती स्वार्थीपणाची असते. पद आणि पैशाचा माज आल्यानंतर त्यांना जुन्या नात्यांचा स्वीकार करण्याची लाज वाटते. “माझ्यामुळेच आज मी आहे,” असा अघोषित अहंकार त्यांच्यात झळकतो. पण वास्तवात, यश म्हणजे फक्त स्वतःचा पराक्रम नसतो; तो कधी कधी आपल्यासाठी रात्रंदिवस झगडणाऱ्या माणसांचाही वाटा असतो. अशी वृत्ती का चुकीची आहे? 1. यश तात्पुरते असते: जीवनात पैसा आणि पद हे तात्पुरते असते. संकटाची वेळ येते, तेव्हा तुमचे खरे स्नेहीच तुमच्या पाठीशी उभे राहतात. तुम्ही त्यांना दूर लोटले असेल तर त्या वेळेस कोण उभे राहणार? 2. विश्वास गमावणे: जे तुमच्यावर कधीकाळी विश्वास ठेवायचे, त्यांना तुम्हीच फसवल्यास, पुढे जाऊन समाज तुमच्यावर कसा विश्वास ठेवेल? 3. मूल्यांचा अभाव: पैसा आणि प्रतिष्ठेच्या शर्यतीत माणूस जर नातेसंबंध & मित्र गमावत असेल, तर तो यशस्वी कसा म्हणायचा? कारण खरं यश म्हणजे नात्यांमध्ये टिकणारा संवाद आणि आदर. डोळ्यात अंजन घालणारी शिकवण “पद आणि पैसा तुमचा भूतकाळ पुसू शकत नाही.” जर आपण आपले नातेवाईक, मित्र आणि संघर्षाच्या साथीदारांना विसरत असाल, तर लक्षात ठेवा, यशाचे शिखरही एकाकी आहे. शेवटी, “लोक तुमचं पद विसरतील, पैसा नष्ट होईल, पण तुमचं वागणं आठवत राहील.” म्हणून कोणत्याही यशामागे असलेल्या हातांचा आदर करा. जिथून सुरुवात झाली, ती जागा विसरणे हा फक्त मूर्खपणाच नाही, तर स्वतःच्या मुळांवर कुर्हाड घालण्यासारखे आहे. पद आणि पैसा घेऊन आलेल्या “माज”ला बाजूला ठेवा आणि माणूसपण टिकवून ठेवा ही सांगायची & पाचोरा शहरातीलच जिवंत परंतु अजिवन आठवणीत राहिल ही या घटनेवरून सांगायची वेळ आली आहे ते म्हणजे पाचोरा शहरात ज्या कंपनीमुळे एक काळ होता शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक लोकांना त्यामुळे रोजगार मिळत होता तर भारतामध्ये त्या मालकाची व कंपनीची एक ओळख होती परंतु जेव्हा वैभव गेले त्यांच्या अंत्ययात्रेला फक्त 13 लोक हजर होते याउलट पद नाही पैसा नाही परंतु कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करणारे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून प्रत्येकासाठी होकार देणारे कृष्णापुरी भागातील रवी टेंन्ट हाऊसचे संचालक स्व सुनिलभाऊ पाटील यांचा जेव्हा स्वर्गवास झाला त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी अक्षरशः स्मशानभूमीत त्यांचे प्रेत तर शेवटचा मनुष्य त्यांच्या घराजवळ एवढा मोठा सर्व जाती – धर्माचा जनसमुदाय त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता हे याच जन्मात आणि फार कमी वर्षात स्वतः मी पाहिले आहे बस यातून काय सांगायचे ते आपल्याला समजले असेलच
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये मुंबई-१ केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या “पाकीट” या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या “लिअर ने जगावं कि मरावं ?” या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी ९ डिसेंबर रोजी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-१ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:- गोदरेज ॲण्ड बॉयज श्रमिक संघ, मुंबई या संस्थेच्या ‘मेला तो शेवटचा होता’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक योगेश कदम (नाटक- लिअर ने जगावं कि मरावं ?), द्वितीय पारितोषिक अभिमान अजित (नाटक- पाकीट), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- लिअर ने जगावं कि मरावं ?), द्वितीय पारितोषिक संजय तोडणकर (नाटक- ती रात्र), नेपथ्य : प्रथम पारितोषिक रोहन रहाटे (नाटक- पाकीट), द्वितीय पारितोषिक विलास गायकवाड (नाटक- द इंटरव्ह्यु), रंगभूषा : प्रथम पारितोषिक अनिल कासकर (नाटक- झेंडा रोविला), द्वितीय पारितोषिक प्रशांत खंदारे (नाटक- मेला तो शेवटचा होता) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुनिल मळेकर (नाटक- पाकीट) व अक्षता सामंत (नाटक- ती रात्र), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे कविता जाधव (नाटक- मेला तो शेवटचा होता), श्रध्दा जोशी (नाटक- घात), स्वप्नाली पवार (नाटक- अशब्द), गुलाब लाड (नाटक- ना ते आपूले), योगेश कदम (नाटक- लिअर ने जगावं कि मरावं ?), साहील कांबळे (नाटक- मेला तो शेवटचा होता), महेंद्र दिवेकर (नाटक- झेंडा रोविला), वैभव पिसाट (नाटक- अरे अरे बाबा) दि. २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर, २०२४ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सतिश पेंडसे, राम चव्हाण आणि प्राची गडकरी यांनी तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
पाचोरा -आज मंगळवार, 10 डिसेंबर 2024 शेतकऱ्यांचा भाजीपाला लिलावात अगदी कमी दराने विकला जात असताना बाजारात ग्राहकांना मात्र याच भाजीपाल्याला अधिक किंमत मोजावी लागते.असे परिस्थिती पाचोरा शहरात दिसत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना मिळणारे कवडीमोल भाव आणि ग्राहकांच्या खिशावर बसणारा भार यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळते. या परिस्थितीचा बेरोजगार तरुणांनी विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा माल आणि बाजारात ग्राहकांना मिळणाऱ्या भावांची तुलना केली असता, भाजीपाल्याचा दर हा शेतमालाची प्रत, साठवणूक, वाहतूक खर्च, आणि मधला दलालीचा भाग यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. हे निश्चित परंतु दर , खर्च , दलाली & नफा याला देखिल मर्यादा आहेत सर्वत्र जळगाव जिल्हयात लिलावातील शेतमालाचे भाव बघीतले तर आज शेतकऱ्यांच्या लिलावात भाजीपाल्याचे 1 कॅरेटचे व KG चे भाव खालीलप्रमाणे होते: सफेद वांगी: ₹150 – ₹200 लाल वांगी: ₹100 – ₹150 भरीत वांगी: ₹100 – ₹200
कारले: ₹20 – ₹25 गिलक (डोंडकं): ₹20 दोडके: ₹25 – ₹30 चवळी: ₹25 वाल: ₹8 – ₹12 गवार: ₹40 – ₹50 भेंडी: ₹25 – ₹30 टमाटे: ₹400 – ₹500 जाड मिरची: ₹30 – ₹35 बारीक मिरची: ₹25 – ₹30 खिरे: ₹8 – ₹12 दुधी भोपळा: ₹100 – ₹200 कटूरले: ₹70 – ₹90 प्रति किलो पोकळा: ₹5 – ₹8 प्रति जोड मिश्रित भाजीपाला कॅरेट: ₹100 – ₹150 ग्राहकांच्या खिशावर ताण सर्वसामान्य बाजारात मात्र या भाजीपाल्याचे दर दुप्पट – तिप्पट किंवा त्याहून अधिक असतात. उदाहरणार्थ, लिलावात ₹25 च्या आसपास असणारी भाजी बाजारात ₹50-₹60 च्या दराने विकली जाते. टमाट्याचा विचार केला तर, शेतकऱ्यांना ₹400 च्या आसपासचा दर मिळतो; मात्र ग्राहकांना तो ₹600-₹800 पर्यंत मोजावा लागतो. मध्यस्थ दलालांचा प्रभाव शेतकऱ्यांच्या उत्पादनांपासून बाजारापर्यंतच्या प्रवासात मध्यस्थ दलाल आणि वाहतूक यंत्रणा मोठी भूमिका बजावतात. शेतकऱ्यांना कमी दर मिळाल्याने त्यांचे उत्पन्न मर्यादित राहते, तर ग्राहकांना महागाईचा फटका बसतो. बेरोजगार तरुणांसाठी संधी ही परिस्थिती बदलण्यासाठी बेरोजगार तरुणांनी थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मॉडेल राबविण्याचा विचार करावा. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य मूल्य मिळेल आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात माल उपलब्ध होईल. तसेच, स्थानिक स्तरावर विक्रीव्यवस्था उभारल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. शेवटचा विचार शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा आणि ग्राहकांनाही स्वस्तात भाजीपाला मिळावा, यासाठी सरकारनेही पुढाकार घेऊन दलाली टाळण्यासाठी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. शेती हा देशाचा कणा असून त्याला बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा एकत्रित होऊन स्वतः किरकोळ विक्रीची आवश्यकता आहे.
६ डिसेंबर १९५६… महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस… अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती… नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती… प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता… त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली… आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेला अवघा देश लोटला… जस कळेल तसं शहरातून, खेडोपाड्यातून पाऊल मुंबईच्या दिशेने पडू लागली होती… या अंत्ययात्रेसाठी उसळलेल्या जनसागराच्या असवाने मुंबईचा रस्ता ओलाचिंब झाला होता… या सगळ्यात एक समांतर गोष्ट घडत होती… या गोष्टी पुढं यायच्या सोडून काळाच्या ओघात गडप झाल्या…. त्या शेवटच्या क्षणांना कायमच कैद करणारे, त्यासाठी आपलं राहत घर आणि आपला छापखाना विकणारे आजही सर्वांसाठी अनभिज्ञच आहेत, ही माहिती पुढं आली नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे…
माजी आमदार, दलित मित्र नामदेवराव व्हटकर यांच्या विषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी… कोल्हापूर जिल्ह्यातील मसूदमाले गावात २४ ऑगस्ट १९२१ मध्ये त्यांचा जन्म झाला… तर ४ ऑक्टोबर १९८२ साली मृत्यू… एकाचवेळी त्यांनी साहित्यिक, संपादक, नाट्यरंग, चित्रपट, नभोवाणी, स्वातंत्र्य सैनिक, प्रगतिशील शेतकरी अशा पंधराहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे… जन्मापासून बसलेल्या जातीयतेच्या चटक्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं… एकदा दाढी करत असताना नाव्ह्याने विचारलं तुम्ही कोणत्या जातीचे… यावेळी दलित म्हणून दिलेल्या उत्तराने नाव्ह्याचा वास्तरा गाल कापून गेला… तो चेहऱ्यावरचा डाग घालवता येणार नाही, पण या देशावरचा अस्पृश्यतेचा डाग मला पुसून काढावा लागेल असा प्रण करून त्यांनी अख्ख आयुष्य यासाठी खर्ची घातलं… वर सांगितलेल्या सर्व क्षेत्रातून त्यांनी या विरोधात आवाज उठवला… त्याच्या या कामाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना पहिला ‘दलित मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं…
६ डिसेंबर रोजी ते मुंबईतच होते…त्यांना बाबासाहेब गेल्याचं कळल्यानंतर अतीव दुःख झालं… त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं…चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या… त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हतं, काहींनी तर “त्याच आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे आम्ही करणार नाही” असं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं… कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी अशा फोल ठरली होती… येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाच महत्व त्यांनी ओळखलं होत… कुणी मदत करो न करो, मी स्वतः करतो असं त्यांनी ठरवलं… पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती… त्याकाळी व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि त्यासाठी रील या इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही…
अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील, कॅमेरा आणि कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला… आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता… काही किरकोळ कारणांसाठी काहीतरी तारण ठेऊन ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत… पण यावेळी रक्कम मोठी होती, त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला… त्यांना याच्या बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले… धावत – पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामनकडे गेले… त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिवस भाड्याने एक कॅमेरा आणला… आणि रात्री १०-११ च्या सुमारास राजगृह गाठले….
बाबसाहेबांचं पार्थिव पहाटे आले… एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.. याच ट्रकवर कसाबसा कॅमेरालावून उभा राहण्याची जागा मिळाली… पहिला शॉट खोदादाद सर्कल वर घेण्यात आला… यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होत… सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहचलं… याठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली… चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं… त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं… बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा याठिकाणी चित्रित झाला… चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आले…
या सगळ्या चित्रीकरणासाठी एकूण २ हजार ८०० फूट रील संपली होती… दुसऱ्या दिवशी बाँबे फिल्म लॅबोरेटरीत ही फिल्म प्रोसेसला देण्यात आली… आता ही फिल्म धुणे, दुसऱ्या पॉझिटिव्हवर रशप्रिंट काढणे आणि एडिटिंग करणे यासाठी अडीच ते तीन हजार खर्च येणार होता… त्यासाठी पुन्हा त्याच मारवाड्याकडे जाऊन त्यांनी राहत घर गहाण ठेऊन तीन हजार रुपये आणले… पुढं या तारण ठेवलेल्या मिळकती सोडवत्या आल्या नाहीत… त्यामुळे त्या कायमच्या गेल्या…मुंबई सोडावी लागली…
मालमत्ता गेली तर गेली… पण बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या, त्यांच्या उघड्या चेहऱ्याचा या जगातील शेवटचा क्षण युगांयुगासाठी कैद करता आलं, याच समाधान त्यांना होतं… आज आपण पाहतोय त्या शेवटच्या क्षणांची नामदेवराव यांनी केलेलं हे जगातील एकमेव चित्रफीत आहे… या गोष्टींचं कधीही श्रेय घेतलं नाही किंवा याच भांडवल केलं नाही… (आज कोल्हापूरात त्यांची जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यात आलं… त्या कार्यक्रमात मला ही माहिती मिळाली… इतिहासातील एवढ्या मोठ्या घटनेचा उल्लेख कुठंच नसल्याची खंत वाटली.. म्हणून ही माहिती तुमच्या समोर आणली…)
यातील चित्रीकरण आणि त्यावेळच्या आठवणी हा संदर्भ त्यांच्या “कथा माझ्या जन्माची” या आत्मचरित्रातून घेतला आहे… नामदेवराव व्हटकर समजून घ्यायचे असतील तर हे आत्मचरित्र नक्की वाचा…
– संगम कांबळे
(एकवेळ लाईक नाही केलात तरी चालेल, पण वाटलं तर पोस्ट नक्की शेअर करा… जेणेकरून इतरांना ही याची माहिती मिळेल…)
भडगाव : भडगाव तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणीची निवड एकमताने व बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी नरेंद्र पाटील तर सचिवपदी विठ्ठल पाटील यांची निवड करण्यात आली. रविवारी, 8 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या निवडीच्या वेळी भडगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, सचिवपदी विठ्ठल पाटील, उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम महाजन व धनराज पाटील, सहसचिवपदी एस. डी. खेडकर, कार्याध्यक्षपदी जावेद शेख, प्रसिद्धी प्रमुखपदी नितीन महाजन, कायदेशीर सल्लागारपदी भरत ठाकरे, तर ज्येष्ठ सल्लागारपदी परमेश्वर मोरे व सुरेश कोळी यांची निवड करण्यात आली. याशिवाय सदस्य म्हणून लिलाधर पाटील, भास्कर शार्दूल, आर. के. मिर्झा, व सुभाष ठाकरे यांची निवड झाली आहे.
भडगाव येथील स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी भूषवले. त्यांनीच कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. बैठकीत सुनिल पाटील, सोमनाथ पाटील, संजय पवार, सुनिल कासार, सागर महाजन, निंबाजी पाटील, राजू दीक्षित, असलम मिर्झा, राकेश पाटील, मनोज पाटील, बापूराव शार्दूल, रमेश धनगर, राजू शेख, परमेश्वर मोरे, सुरेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे गावागावांतून तसेच तालुक्यात विविध स्तरांवरून अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीनंतर भडगाव तालुका पत्रकार संघाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे साप्ताहिक झुंज व ध्येय न्यूज परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन
पाचोरा शहरातील आनंद मेडिकल चे संचालक आणि प्रजापत परिवाराचे आधारस्तंभ, तसेच नेहमी गोरगरीब, गरजू व रुग्णांची मदत करणारे कै. कन्हैयालाल काका प्रजापत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पाचोरा शहरात शोककळा पसरली असून, सर्व स्तरांतील नागरिकांनी या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केला आहे. कै. कन्हैयालाल काका प्रजापत हे सर्व धर्म व जातीच्या सामाजिक कार्यासाठी व मदतीच्या वृत्तीमुळे प्रसिद्ध होते. त्यांनी गोरगरिबांना औषधोपचारांसाठी वेळोवेळी मदत केली. अनेक रुग्णांसाठी ते आधार होते. त्यांच्या स्वभावामुळे व समाजसेवेच्या भावनेमुळे ते शहरातील प्रत्येकाच्या हृदयात आदराचे स्थान निर्माण करू शकले. त्यांची अंत्ययात्रा उद्या, सोमवार, 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता राहते घर, विवेकानंद नगर, पाचोरा येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि असंख्य आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने प्रजापत कुटुंबाला मोठी हानी झाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे कै. कन्हैयालाल काका प्रजापत यांचे सामाजिक योगदान आणि कर्तृत्व कायम स्मरणात राहील. त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचे नाव नेहमी आदराने घेतले जाईल.प्राध्यापक कुटुंबियांच्या दुःखात साप्ताहिक झुंज & ध्येय न्युज परिवार सहभागी आहे