मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : देशभरात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमीच्या सणात महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाला खास महत्त्व आहे. विशेषतः मुंबईतील गोविंदा पथकांनी या उत्सवाला नवा झगमगता चेहरा दिला आहे. अशाच मुंबईतील अग्रगण्य आणि मानाच्या पथकांपैकी एक म्हणजे वांद्रे-खार-सांताक्रुझ विभागातील “शिवाज्ञा गोविंदा पथक”. हे पथक गेली ७ वर्षे सातत्याने विविध मानाच्या दहीहंडीमध्ये सहभागी होत असून, थर लावून दहीहंडी फोडण्यात आघाडीवर राहिले आहे.
“परंपरेशी नाळ जपणारे, संस्कृतीशी नातं टिकवणारे, आणि एकजुटीने थर लावणारे – शिवाज्ञा गोविंदा पथक!” या पथकाची स्थापना सन २०१७ मध्ये सन्मानीय रुपेश मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकातील बाळगोपाळांनी कठोर मेहनत, सातत्य आणि शिस्तीतून हे पथक नावारूपाला आणले आहे. अनेक चढ-उतारांना तोंड देत त्यांनी आपली वाटचाल यशस्वीपणे चालू ठेवली. यंदा ८व्या वर्षात पदार्पण करत, दहीहंडी सरावाला श्रीफळ वाढवून औपचारिक सुरुवात श्री. मालुसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात शिवाज्ञा पथकाने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, या पथकावर अनेक लहान-मोठ्या गोविंदा पथकांचा विश्वास आहे. त्यामुळे खार, वांद्रे व सांताक्रुझ परिसरातील अन्य पथकांनीही या संघात सहभाग घेतला आहे. रोजगार, शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना आज अनेक पारंपरिक पथके मागे पडताना दिसतात. मात्र, शिवाज्ञा गोविंदा पथकाने ही परंपरा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत उत्सवप्रियतेचा उत्साही धागा जपला आहे.
या वर्षीच्या तयारीसाठी सर्व सदस्य जोमाने सरावास सज्ज झाले आहेत. एकजुटीचा, टीमवर्कचा आणि सांस्कृतिक वारशाचा उत्तम मिलाफ या पथकात पाहायला मिळतो. हे पथक केवळ दहीहंडीपुरतं मर्यादित नसून, सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि युवकांचे संघटन यासाठीही ते एक प्रेरणास्थान बनले आहे.
विरार (गुरुदत्त वाकदेकर) : श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी (CBSE), विरार यांच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना कोळवणकर यांना मुंबई विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी सन्मानाने प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी त्यांनी “A Study of Essential Teaching Skills of 21st-Century In-Service Teachers at Primary Level” या विषयावर प्रबंध सादर करून प्राप्त केली आहे.
गेल्या ८ वर्षांपासून CBSE बोर्डाच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. रंजना कोळवणकर यांना मुंबई विद्यापीठाच्या डी.एल.एल.इ. विभागाचे डॉ. कुणाल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षणाच्या आधुनिक गरजा आणि २१व्या शतकातील प्राथमिक शिक्षकांची कौशल्ये या संदर्भातील त्यांचा अभ्यास प्रबंध अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.
या यशामागे आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर रंजना यांचे कुटुंबीय, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल डॉ. कोळवणकर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच शोध निबंधासाठी माहिती संकलन करताना विरार परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक यांनी दिलेली मदतही त्यांनी कृतज्ञतेने नमूद केली आहे.
डॉ. रंजना कोळवणकर यांच्या या शैक्षणिक यशामुळे तारामाई वर्तक विद्यालयाच्या आणि विरार परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लीड्स (गुरुदत्त वाकदेकर) : कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने इतिहास रचत भारतावर पाच विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. डकेटच्या भेदक शतकासह क्रॉली व रूट यांच्या अर्धशतकांच्या बळावर ३७१ धावांचे लक्ष्य सहज पार करत इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १–० अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात ४७१ धावांची दमदार मजल मारली. इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल ४६५ धावा करत भारताला केवळ ६ धावांची लहानशी आघाडी दिली. दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६४ धावांवर तंबूत परतला आणि इंग्लंडपुढे ३७१ धावांचे लक्ष्य उभे राहिले. पाचव्या दिवशी इंग्लंडने २१/० पासून सुरुवात केली आणि भारताच्या गोलंदाजांना पहिल्या सत्रात यश मिळू दिले नाही. जॅक क्रॉली (६५) आणि बेन डकेट (१४९) यांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी करून विजयाचे मजबूत पायाभरणी केली. दुसऱ्या सत्रात भारताने चार गडी बाद केले, पण रूट (५३) आणि जेमी स्मिथ (४४) यांनी संयमी फलंदाजी करत इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात अपेक्षित धार दाखवली नाही. पहिल्या डावात पाच बळी घेणारा जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात एकही विकेट मिळवू शकला नाही. प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर रवींद्र जडेजाने एक विकेट मिळवली. या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत खेळत होता. शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आले, मात्र त्याच्या कर्णधारपदाच्या सुरुवातीलाच पराभवाचा तडाखा बसला. भारताची खालची फळी दोन्ही डावांत अपयशी ठरली आणि गोलंदाजीसुद्धा निर्णायक क्षणी प्रभावहीन ठरली. या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (२०२५–२७) नव्या चक्रात भारताची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. भारत गुणतक्त्यामध्ये चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लीड्समध्ये विजय मिळवलेल्या इंग्लंडच्या खात्यात १२ गुण असून, १०० टक्के गुण टक्केवारीसह ते अव्वल स्थानी आहेत. बांगलादेश व श्रीलंका अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. आता भारतासमोर तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटीचे आव्हान आहे, जी बर्मिंगहॅम येथे खेळली जाणार आहे. भारत पुनरागमन करू शकेल का? ही लढत निर्णायक ठरणार असून, सर्वांचे लक्ष त्या सामन्यावर लागले आहे.
मेष: आज एखाद्या नव्या जबाबदारीची सुरुवात होईल. जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संवाद साधाल. आर्थिक क्षेत्रात अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. जुने मित्र भेटतील. शुभ अंक: ३, शुभ रंग: तांबडा
वृषभ: घरगुती वातावरणात समाधान मिळेल. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक होईल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. शुभ अंक: ६, शुभ रंग: क्रीम
मिथुन: नवीन योजना मनात येतील व अंमलातही येतील. मैत्रीच्या नात्यांत पारदर्शकता ठेवा. विद्यार्थ्यांना यशाचे संकेत आहेत. प्रवासाचे योग आहेत. शुभ अंक: ५, शुभ रंग: हिरवा
कर्क: कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. आज मन स्थिर राहील. काही जुनी चिंता दूर होईल. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस नाही. शुभ अंक: २, शुभ रंग: पांढरा
सिंह: व्यवसायिकांसाठी लाभदायक दिवस. सृजनात्मक कामांना उत्तेजन मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. अहंकार टाळा. शुभ अंक: १, शुभ रंग: सोनेरी
कन्या: कसोटीचे क्षण येतील पण संयम ठेवावा लागेल. प्रेमसंबंधात पारदर्शकतेची गरज. कामांमध्ये अडथळे येतील पण धीर बाळगा. शुभ अंक: ४, शुभ रंग: राखाडी
तुला: मनात कल्पनांची गुंफण होईल, लिखाण व कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम संधी. पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहा. नवे करार होतील. शुभ अंक: ७, शुभ रंग: गुलाबी
वृश्चिक: भावनिक निर्णयांपेक्षा वास्तव पाहून निर्णय घ्या. एखादे जुने नातं पुन्हा उबदार होईल. उत्पन्नात थोडी वाढ अपेक्षित. शुभ अंक: ९, शुभ रंग: जांभळा
धनु: परदेशाशी संबंधित गोष्टींमध्ये यश येईल. शैक्षणिक क्षेत्रात भरघोस प्रगती. पण वाणीवर नियंत्रण ठेवा. वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. शुभ अंक: ८, शुभ रंग: केशरी
मकर: कामात परिश्रमाच्या तुलनेत यश मिळेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त. आर्थिक कामात स्थैर्य राखा. शुभ अंक: १०, शुभ रंग: काळा
कुंभ: मित्रांच्या सहकार्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरगुती खर्च वाढेल. कोणताही निर्णय घेताना भावनांवर नाही, तर विवेकावर विसंबा. शुभ अंक: ११, शुभ रंग: निळा
मीन: आजचा दिवस आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य. मनातले द्वंद्व कमी होईल. जोडीदाराशी मतभेद शक्य, संवाद ठेवा. शुभ अंक: १२, शुभ रंग: फिकट पिवळा
पाचोरा – शहरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या वाघ कुटुंबाच्या जनसेवेच्या परंपरेला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दि पाचोरा पिपल्स को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळावर अनुसूचित जमाती (NT) प्रवर्गातील एकमेव अर्जदार म्हणून आल्याने विकास वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या समाजकार्याला, पारदर्शक व प्रामाणिक व्यवस्थापन कौशल्याला मिळालेली साक्ष आहे, तसेच ही निवड त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेचा आणि कार्यक्षमतेचा ठोस पुरावा आहे. विकास वाघ हे पाचोरा शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जनमानसात रुजलेले नाव आहे. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय तब्बल ७१ वर्षांपासून दुग्धजन्य पदार्थांच्या व्यापाराशी निगडीत आहे. दूध, दही, तूप अशा पारंपरिक व्यापारात सातत्य आणि गुणवत्ता यामुळे या घराण्याने पाचोऱ्यात विश्वासार्हता निर्माण केली आहे. स्व. अण्णासाहेब ज्ञानेश्वर वाघ यांच्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय केवळ आर्थिक उत्पन्नाचे साधन न राहता जनतेशी जुळलेली नाळ बनला. स्व. अण्णासाहेब वाघ हे पाचोरा नगरपालिकेचे माजी नगर उपाध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या काळात प्रामाणिकपणे प्रशासनात सहभाग घेतला आणि नगर विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत विकास वाघ यांनीही आपले पाऊल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात टाकले आणि त्या वाटचालीत उल्लेखनीय ठसा उमटविला. विकास वाघ यांनी यापूर्वी ॲड अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे पाचोरा पिपल्स को-ऑप. बँकेच्या संचालक पदावर यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्या काळात अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात त्यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, ग्राहकाभिमुख धोरणे, आणि योजनांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय वर्गाला केंद्रस्थानी ठेवले. अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात बँकेची विकासदरांची चढती कमान, ग्राहकांमध्ये असलेला विश्वास आणि आर्थिक धोरणातील प्रामाणिक दृष्टीकोन यामुळे त्यांना पुन्हा एकदा बिनविरोध निवड मिळवता आली. अनुसूचित जमाती (NT) प्रवर्गातील ही जागा केवळ नाममात्र आरक्षण नसून वंचित समाजातील प्रतिनिधित्वाचे प्रतीक आहे. विकास वाघ यांचा सामाजिक सुसंवाद, सर्वपक्षीय सौहार्द आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे या जागेसाठी कोणीही दुसरा उमेदवार न उभा राहिल्याने ही निवड बिनविरोध झाली. निवडणूक प्रक्रियेतून जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, हे या निवडीमागचे खरे यश मानले जात आहे. विकास वाघ हे केवळ आर्थिक संस्था किंवा बँकेपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा सामाजिक व राजकीय सहभागही अत्यंत व्यापक आहे. त्यांच्या घराण्याचा राजकीय वारसा हेच त्यांच्या नेतृत्वगुणांचे मूळ मानले जाते. त्यांचे भाऊ किरण वाघ यांच्या पत्नी सौ. आशा वाघ व रवींद्र वाघ यांच्या पत्नी सौ. मंगला वाघ या दोघी पाचोरा नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. या महिलांनी त्यांच्या कार्यकाळात महिला सबलीकरण, नागरी सुविधा, आणि परिसर विकासावर विशेष भर दिला. या पार्श्वभूमीवर विकास वाघ यांचे राजकीय कार्यही लक्षणीय आहे. त्यांनी पाचोरा शिवसेना शहरप्रमुख पद भूषवले असून, तेव्हा त्यांनी शहराच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली होती. पुढे पाचोरा शेतकरी सहकारी संघाचे व्हा. चेअरमन म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. तरुणांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी NSUI शहरप्रमुख तसेच युवक काँग्रेस प्रदेश सचिव म्हणून कार्य केले. या सर्व पदांवर कार्य करत असताना त्यांनी कोणत्याही पक्षाच्या काठी टेकून नव्हे, तर स्वबळावर राजकीय जम बसवला. सर्वसामान्य जनतेशी सतत संपर्क ठेवणारा, गरजूंना तत्परतेने मदत करणारा आणि कोणत्याही पदाच्या हव्यासाशिवाय काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा समाजात तयार झाली आहे. विकास वाघ यांचे नेतृत्वगुण हे त्यांच्याकडील वैयक्तिक नम्रता, निर्णयक्षमता आणि संघटनशक्तीवर आधारित आहेत. बँकेच्या प्रशासनात अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला, आर्थिक शिस्तीचे पालन केले आणि कर्जवसुलीचे प्रमाण वाढवले, त्यातून त्यांची व्यवस्थापन कौशल्ये अधोरेखित होतात. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संवाद ठेवतात आणि कोणताही निर्णय एकतर्फी न घेता सर्वांच्या सल्ल्याने घेतात, ही त्यांची खासियत आहे. अत्यंत नम्र स्वभाव, हसतमुख चेहरा, पण वेळ आली की कठोर निर्णय घेण्याची धमक असलेले श्री संघवी यांचे नेतृत्व पाचोऱ्याच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विकास वाघ हे सामाजिक कार्यातही अग्रणी आहेत. शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत, आपत्कालीन सहाय्य अशा अनेक गोष्टींसाठी ते नेहमी पुढे असतात. त्यांचा ‘कुठल्याही कार्यक्रमाचा मुख्य पाहुणा नव्हे, तर कार्यकर्ताच’ हा दृष्टिकोन त्यांना जमिनीवरचे नेतृत्व देतो. पाचोरा शहरात विविध धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम आणि आपत्ती काळातील मदत कार्यात त्यांचा हातभार असतो. पाचोरा पिपल्स बँकेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात विकास वाघ यांच्याकडून ग्राहकांमध्ये डिजिटल व्यवहाराचा प्रसार, शेतकरी कर्ज वाटपातील पारदर्शकता, महिला बचतगटांना सहकार्य, तसेच ग्रामीण शाखांमध्ये बँकेच्या विस्ताराची अपेक्षा आहे. बँकेची सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचवण्याची आणि तिचा उपयोग समाजाच्या खऱ्या गरजांसाठी करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. विकास वाघ यांची दि पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड ही केवळ निवडणूक यश नसून, त्यांच्यावरील समाजाच्या विश्वासाची पुनरावृत्ती आहे. त्यांच्या बिनधास्त, पारदर्शक आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे पाचोऱ्यातील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राला दिशा मिळते आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर नव्याने जबाबदाऱ्या आल्या असून, जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ते अधिक जोमाने कार्य करतील, हीच अपेक्षा.
पाचोरा – कोणतीही संस्था ही शिक्षणक्षेत्रातील असो, आर्थिक व्यवहारांची असो वा सामाजिक सेवाभावी कार्यात गुंतलेली असो, तिची खरी ओळख ही तिच्या पारदर्शक कारभारातून, जबाबदारीने घेतलेल्या निर्णयांतून आणि सर्वसमावेशक नेतृत्वातून घडते. जर एखादी संस्था प्रगतीपथावर आहे, तिच्या कारभारात पारदर्शकता आहे आणि ती संस्था समाजहिताच्या दिशेने प्रामाणिकपणे कार्यरत आहे, तर अशा संस्थेत फक्त विरोधासाठी विरोध करणे, केवळ राजकीय प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून अडथळा निर्माण करणे हे कोणत्याही प्रकारे समाजहिताचे लक्षण नसते. पाचोरा, जामनेर, भडगाव या तालुक्यांतील विविध राजकीय गटांनी याच विचारसरणीला अनुसरून एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘दि पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.’च्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीत सर्व राजकीय गटांनी, पक्षीय भूमिका बाजूला ठेवून, बँकेच्या हितासाठी एकत्रितपणे कार्यक्षम नेतृत्वाला आपला पाठिंबा देत समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. गेल्या पाच वर्षांत या बँकेने उल्लेखनीय अशी वाटचाल केली आहे. बँकेचे चेअरमन अॅड. अतुलभाऊ संघवी, व्हा. चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल आणि संपूर्ण संचालक मंडळाने आपल्या कार्यकुशल नेतृत्वाखाली बँकेचा आर्थिक आलेख उंचावला असून बँकेला आधुनिक व पारदर्शक कार्यपद्धतीचा आदर्श नमुना बनवले आहे. ग्राहकांचा विश्वास, सभासदांचे समाधान आणि शाखा विस्ताराच्या माध्यमातून बँकेची ओळख आता जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रस्थापित होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण १५ जागा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्वसाधारण ९, शाखा प्रतिनिधी १, महिला २, ओबीसी १, अनुसूचित जातीसाठी १ आणि अनुसूचित जमाती (NT) साठी १ जागा होती. या १५ जागांसाठी पाचोर्यातील एकूण ३५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. परंतु यामधील तब्बल २८ उमेदवारांनी एकमताने अॅड. अतुल संघवी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनलला आपला पाठिंबा जाहीर करून संस्थेच्या प्रगतीपथावर चालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निवडणुकीत विशेष महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या निवडणुकीत अॅड. अतुल संघवी व माजी चेअरमन अशोकशेठ संघवी यांच्यात पॅनल विरुद्ध पॅनल अशी चुरशीची लढत रंगली होती. मात्र यंदा त्या वादाला बाजूला ठेवत स्वतः अशोकशेठ संघवी यांचे सुपुत्र राहुल संघवी यांनी देखील अॅड. अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला आहे. राहुल संघवी यांनी आपली उमेदवारी सादर करताना नवव्या क्रमांकावर स्वतःची सही देत, एका सकारात्मक आणि एकसंघ निवडणुकीकडे वाटचाल सुरू केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या निवडणुकीत संघर्षाची शक्यता लोप पावत असून, सर्व पदांवर बिनविरोध निवड होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.या निवडणुकीत अतुल सांगवी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविणाऱ्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – 1) अविनाश भालेराव, 2) भरत खंडेलवाल, 3) शरद पाटे, 4) संगिता पाटे, 5) प्रकाश पाटील, 6) संध्या पाटील, 7) आदित्य पाटील, 8) देवेंद्र कोटेच्य, 9) राहुल संघवी, 10) अल्पेश संघवी, 11) अनंत पाटील, 12) भागवत महाकपूरे, 13) स्वप्निल पाटील, 14) विकास वाघ, 15) अनिल येवले, 16) विलास जोशी, 17) शांताराम पाटील, 18) पवन अग्रवाल, 19) प्रशांत अग्रवाल, 20) चंद्रकांत लोढाया, 21) नरेंद्र पाटील, 22) सचिन संचेती, 23) प्रदीप पाटील, 24) अविनाश कुडे, 25) सुभाष अग्रवाल, 26) मोहन अग्रवाल, 27) ललिता चौधरी आणि या सर्व उमेदवारांनी बँकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, “पाचोरा पिपल्स बँकेची प्रगती हेच आमचे एकमात्र ध्येय आहे” असे ठामपणे जाहीर केले असून, आपापल्या सह्यांसह लेखी सहमती दिली आहे. ही बाब या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीत निर्माण झालेला हा सकारात्मक समन्वय राजकीय क्षेत्रासाठी आदर्श ठरावा अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करत आहेत. कारण इथे कोणत्याही राजकीय गटाने आपल्या पक्षाचा आग्रह धरला नाही, कोणतीही राजकीय कुरघोडी केली गेली नाही आणि केवळ प्रामाणिक कार्य करणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यात आला आहे. हेच खरे नेतृत्वाचे लक्षण असते, जे व्यक्तिगत वा पक्षीय हितापेक्षा संस्थेच्या एकूण प्रगतीला प्राधान्य देते. यामुळेच ही निवडणूक केवळ बँकेपुरती मर्यादित न राहता, सामाजिक सलोख्याचा, संघटनबळाचा आणि एकात्मतेचा संदेश देणारी ठरली आहे. पाचोरा, जामनेर व भडगाव परिसरातील सर्व राजकीय गट, सामाजिक संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन दिलेला पाठिंबा, बँकेच्या नेतृत्वाने कमावलेला विश्वास आणि प्रगतीची सातत्याने दिसणारी चिन्हे पाहता, ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. अर्थात अद्याप काही उमेदवारांचा अधिकृत माघार अर्ज शिल्लक असला तरीही, या सकारात्मक सहमतीच्या पार्श्वभूमीवर एकोपा व सहकार्याचाच सूर अधिक बुलंद होताना दिसत आहे. या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अनुसूचित जमाती (NT) कोट्यांतर्गत असलेल्या जागेसाठी माजी संचालक विकास ज्ञानेश्वर वाघ यांची उमेदवारी आधीच निश्चित करण्यात आली असून, त्यांच्याबाबत कोणताही अन्य उमेदवार रिंगणात नाही.संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेकडे बँकेचे सभासद, खातेदार, स्थानिक नागरीक आणि समाजमाध्यमांतील वर्तुळ यांचे लक्ष लागून आहे. बँकेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवण्यासाठी, नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्या सर्व उमेदवारांची भूमिका प्रशंसनीय असून, त्यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण सहकार क्षेत्रात प्रेरणादायी ठरेल. या निवडणुकीतून एक स्पष्ट संदेश समाजास मिळतो – राजकारण हे संस्था चालविण्याचे केंद्रबिंदू नसून, संस्था चालवण्यासाठी जबाबदार नेतृत्व आणि सामंजस्यपूर्ण सहयोग आवश्यक असतो. पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीने ही बाब अधोरेखित केली असून, “संस्थेच्या प्रगतीपलीकडे कोणतेही मतभेद नसावेत” हा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
पाचोरा- पत्रकारिता ही समाजाच्या आरशासारखी असते, ती सत्य दर्शवते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या रूपाने जनतेच्या हितासाठी कार्य करते. मात्र पाचोऱ्यात अलीकडील काळात या पवित्र क्षेत्रात ब्रेकींग टाकून पोलभरू अशा भुरट्या लोकांचा शिरकाव झाला आहे की, त्यांना पाहून खरे पत्रकार सुद्धा लाजेनं मान खाली घालतात. पत्रकार संघटनेच्या नावाखाली कार्यरत असणाऱ्या काही तथाकथित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारितेचा मुखवटा घालून प्रत्यक्षात ब्लॅकमेलिंग, खंडणी व दहशतीचा बाजार मांडला आहे. पत्रकार संघटनेचा पदाधिकारी असणे म्हणजे पत्रकार असणे नव्हे. एखादा व्यक्ती कोणत्याही पत्रकार संघटनेत पदाधिकारी झाला, याचा अर्थ असा होत नाही की त्याला पत्रकारितेचे नीतीमूल्य, चौकस अभ्यास, सत्यशोधक वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी आहे. पत्रकार होण्यासाठी आवश्यक असतो तो माध्यमाचा अभ्यास, लेखन कौशल्य, सत्यतेवर आधारित विश्लेषण, समजूतदार संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकहितासाठी कार्य करण्याची जबाबदारी. परंतु पाचोऱ्यात अलीकडे असे अनेक प्रसंग समोर येत आहेत की, जेथे पत्रकार हे केवळ एक टॅग बनले आहे, तर प्रत्यक्षात त्यामागे लपलेली असते ती आर्थिक शोषणाची, राजकीय सौदेबाजीची, आणि सामाजिक अराजक माजवण्याची अघोरी वृत्ती. पाचोऱ्यात काही तथाकथित पत्रकार, ज्यांना ना पत्रकारितेचे शिक्षण आहे ना पत्रकार क्षेत्रातील कसोटी गाठलेली आहे, त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ‘पत्रकार’ या ओळखीचा दुरुपयोग करण्याचा नवा धंदा सुरू केला आहे. पत्रकार परिषदांमध्ये उपस्थित राहणे, राजकीय, प्रशासकीय कार्यक्रमांत शिरकाव करणे आणि नंतर त्यातून फायद्याचे व्यवहार साधणे हेच यांचे प्रमुख उद्दिष्ट असते. एखाद्या सामान्य घटनेला विकृत रूप देऊन त्यावर बनावट,ब्रेकिंग, अतिशयोक्त, अथवा अर्धसत्य बातम्या तयार केल्या जातात. नंतर त्याच बातम्यांवरून संबंधितांवर दबाव आणून, “बातमी थांबवू का?” किंवा “तुमच्यावरील आरोप सौम्य करून देऊ का?” अशा पद्धतीने पैसे उकळले जातात. यामागे कोणतेही पत्रकारितेचे तत्त्व नसून केवळ ब्लॅकमेलिंगचा उद्देश असतो. वास्तविक, पत्रकार परिषद म्हणजे विविध मुद्यांवर माध्यमांसमोर माहिती देण्याचे एक व्यासपीठ. या व्यासपीठावर खरे पत्रकार जेव्हा जाणीवपूर्वक प्रश्न विचारतात, विश्लेषण करतात, तेव्हा जनतेपर्यंत सत्य पोहचते. परंतु पाचोऱ्यात अशा तथाकथित पत्रकारांची संख्या वाढली आहे की, जे ना प्रश्न विचारतात ना माहितीचे महत्त्व समजतात. त्यांच्या उपस्थितीचा उद्देश केवळ फोटो काढणे, नंतर त्याच फोटोवर ‘मी पत्रकार’ असा दर्पाने उल्लेख करणे, आणि त्यातून समाजात एक खोटे वलय निर्माण करणे इतकाच असतो. खरे पत्रकार त्याच परिषदांमध्ये बसताना लाज वाटते की, “या मंडळींच्या शेजारी आपणही आहोत” असे वाटून आत्मग्लानी निर्माण होते. पत्रकार क्षेत्रात असा अपमानास्पद प्रसंग येणे ही एक मोठी शोकांतिका आहे. तथाकथित पत्रकार संघटनांची निर्मिती सुद्धा आता एक स्वतंत्र यंत्रणा बनली आहे. यातील अनेक संघटना निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी, पद मिळवण्यासाठी, किंवा राजकीय-सामाजिक प्रभाव दाखवण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. या संघटनांमध्ये निवडणुका होत नाहीत, पद् नियुक्तीचे नियम नाहीत, कोणतेही तपशीलवार कार्य नाही. केवळ काही स्वयंघोषीत नावे, पद, बॅनर, आणि प्रेसकार्ड तयार करून एकमेकांचे पाठीशी देत गट निर्माण केले जातात. यातील अनेक संघटनांच्या बैठकीत “प्रसिद्धीसाठी काहीतरी करून दाखवू” असे बिनबुडाचे प्रस्ताव घेतले जातात. हेच तथाकथित संघटित लोक आज प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, शासकीय कर्मचारी, राजकीय नेते यांच्या मागे लागून त्यांना ब्लॅकमेल करताना दिसतात. त्यांच्याकडे काहीच पुरावे नसतात, पण “तुमच्याबद्दल लिहून टाकू”, आम्हाला वैयक्तिक काहीच नको संघटनेला द्या ,”फेसबुकवर लाइव्ह जाऊ”, “यूट्यूबवर अपलोड करू” अशा धमक्यांनी ते पैसा, सवलती, मदतीसाठी आग्रही होतात. पत्रकारिता ही ‘कोणीही करू शकतो’ असा व्यवसाय नव्हे. ही एक संवेदनशील, अभ्यासपूर्ण आणि मूल्याधारित प्रक्रिया आहे. पत्रकार होण्यासाठी केवळ मोबाईल, मायक्रोफोन, किंवा प्रेसकार्ड पुरेसे नाही. पत्रकाराला विषयाचे अध्ययन, समाजातील चालू घडामोडींचे भान, घटनांचे विश्लेषण, आणि भाषा, शिस्त यांचे भान असणे आवश्यक असते. तेव्हा फक्त पत्रकार संघटनेचा पदाधिकारी असण्यामुळे कोणीही ‘पत्रकार’ होऊ शकत नाही. त्याला त्या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काही गोष्टी अनिवार्य आहेत – जसे की, माध्यम क्षेत्रात कामाचा अनुभव, कोणत्याही मान्यताप्राप्त माध्यमासाठी केलेले लेखन, संवाद कौशल्य, आणि पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांची निष्ठा. पाचोरा हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. या शहरात खरे पत्रकार मोठ्या मेहनतीने, वर्षानुवर्षे काम करत आले आहेत. त्यांनी पाचोऱ्यातील समस्यांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे, आणि समाज जागृती घडवून आणली आहे. परंतु अलीकडील काळात फक्त स्वार्थासाठी निर्माण झालेल्या पत्रकार संघटनांनी आणि त्यातील स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी हे क्षेत्रच बदनाम करून टाकले आहे. पत्रकारिता क्षेत्राच्या या ऱ्हासाला केवळ माध्यमच नव्हे, तर समाजही जबाबदार आहे. कारण अनेकदा समाज देखील या तथाकथित पत्रकारांना ‘अरे पत्रकार आहेत बरं का’ असे म्हणत त्यांच्या मागे वळवळतो, त्यांना मान देतो, आणि त्यांच्या चुकीच्या कृत्यांना विरोध करण्याऐवजी थांबवण्याऐवजी अधिक सशक्त बनवतो. अशा प्रकारच्या व्यक्तींवर कारवाई करणे, हे स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभागाचे काम आहे. पत्रकारितेचा मुखवटा घालून खंडणी मागणाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधानांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. पाचोऱ्यातही अलीकडे काही प्रकरणे समोर आली आहेत, जिथे अशा पत्रकार संघटनांतील पदाधिकाऱ्यांवर खंडणीच्या गुन्ह्यांत कारवाई झाली आहे. मात्र ही कारवाई अपवादात्मक असून त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी पत्रकार महासंघ, राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पत्रकार संघटना आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे कार्यवाही करणे गरजेचे आहे. खरे पत्रकार कोण, त्यांच्या संस्था काय आहेत, त्यांना कोणत्या माध्यमाचे प्रतिनिधित्व आहे याबाबत सुस्पष्ट निकष आणि मान्यता पद्धत राबवली पाहिजे. या साऱ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते – पत्रकारिता क्षेत्राने आता स्वतःचा आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. जर या क्षेत्रातील व्यक्तीच एकमेकांवर अविश्वास दाखवतील, तर समाज या क्षेत्रावर कसा विश्वास ठेवणार? तरीसुद्धा खरे पत्रकार आजही न थकता, न डगमगता आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांनी या भुरट्या पत्रकारांपासून स्वतःचा वेगळा आवाज आणि ओळख राखण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर, समाजानेही खऱ्या पत्रकाराचा सन्मान आणि खोट्याची निर्भत्सना करण्याची शिकवण अंगीकारली पाहिजे. पाचोऱ्यात सध्या पत्रकारितेचा गोंधळ उडाला असला, तरी या क्षेत्राची खरी मूल्ये आणि कार्यधारणा अबाधित ठेवण्यासाठी समाज, माध्यम, आणि प्रशासन यांनी मिळून पुढाकार घेतल्यास या ब्लॅकमेलिंगवाल्यांचे दिवस भरत नाही. कारण शेवटी खोटं कितीही गोंडस वाटले, तरी ते टिकत नाही आणि खरे कितीही दबले तरी शेवटी समोर येतेच.
पाचोरा- पत्रकारिता ही मूल्याधारित, समाजोपयोगी आणि जबाबदारीची भूमिका बजावणारे क्षेत्र असले तरी, पाचोरा शहरात या क्षेत्राचा केवळ वापर नव्हे, तर बेधडक गैरवापर सुरू आहे. केवळ ‘पत्रकार संघटना’ या नावाचा बुरखा पांघरून काही बोगस आणि स्वयंघोषित पत्रकारांनी आता नव्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारितेशी दूरदूरचा संबंध नसलेले काही लोक आणि संघटना आता ‘पुरस्कार वितरण’ या नावाखाली संपूर्णपणे व्यावसायिक आणि फसवणुकीचा प्रकार सुरू करत आहेत. हा एक नव्याने उगम पावलेला गोरखधंदा असून ‘मागच्या दाराने पैसे घ्या आणि पुढच्या दाराने सन्मान द्या’ या तत्त्वावर तो सर्रास चालतो आहे.या तथाकथित पत्रकार संघटना पुरस्कारासाठी कोणताही निकष निश्चित करत नाहीत. ना त्यामागे कोणती मान्यताप्राप्त संस्था असते, ना अभ्यास, ना निवड समिती. केवळ ठराविक शुल्क वसूल करून कोणालाही मंचावर बोलावून माणसाला हातात स्मृतीचिन्ह देऊन फोटो काढला की झालं — पुरस्कार प्रदान! आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, पुरस्कारासाठी हपापलेल्या काही मंडळींनी आता शिक्षण, प्रतिष्ठा आणि मूल्यांचा विचारही करणे सोडून दिले आहे. कोण देतोय? कशासाठी देतोय? याचा विचारही न करता या तथाकथित ‘पत्रकार संघटनां’च्या रंगीत बॅनरसमोर उभं राहून, हसऱ्या चेहऱ्याने ‘मी पुरस्कारप्राप्त’ असल्याचा आव आणणं हेच जणू नवे सामाजिक स्टेटस बनू लागले आहे. या बोगस पुरस्कारांचे स्वरूप ठरलेले असते. आधी निवडलेल्या ‘पुरस्कारार्थी’ व्यक्तींची यादी तयार केली जाते, आणि त्यांच्याशी ‘आम्ही तुम्हाला राष्ट्रीय/राज्य/जिल्हा पुरस्कार देणार आहोत’ असे सांगून गोडगोड भाषण केले जाते. मग शुल्क सांगितले जाते — ५०० रुपये ते ५००० रुपये, प्रसंगी त्याहूनही अधिक. या रकमेच्या मोबदल्यात स्मृतीचिन्ह, सर्टिफिकेट, एका व्यासपीठावर दोन फोटो, आणि पुढे सोशल मीडियावर ‘पुरस्कार प्रदान सोहळा’ असे कॅप्शन. बस्स. ना त्या व्यक्तीच्या कार्याचा तपशील, ना कसलीच निवड प्रक्रिया, ना पारदर्शकता. ही एकप्रकारची ‘पुरस्कार विक्री प्रक्रिया’ आहे, जी पुरस्काराच्या पवित्रतेचा घोर अपमान करत आहे. या पत्रकार संघटनांचे दुसरे सत्य म्हणजे — यांचे स्वतःचे कोणतेही माध्यम नाही, ना कार्यालय, ना मान्यता. केवळ छापील बॅनर, एका यूट्यूब चॅनलचा लोगो, आणि काही मूठभर भंपक कार्यकर्ते यावर त्यांचा डोलारा उभा असतो. पुरस्कार देण्याच्या नावाखाली ते सभागृह, शाळा, मंगल कार्यालय, याठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात. प्रत्यक्षात यामागचा उद्देश असतो फक्त पैसा गोळा करणे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी स्थानिक व्यापारी, शिक्षक, लघुउद्योजक, काही वेळा सरकारी कर्मचाऱ्यांनाही अशा कार्यक्रमात समाविष्ट करून ‘पुरस्कार’ देऊन ते त्यांच्याच माध्यमातून स्वतःचा सामाजिक दबाव वाढवतात या सगळ्या प्रकाराला दुसरीकडे समाजाची चूकही कारणीभूत आहे. काही मंडळी स्वतःहून अशी बोगस मंडळी शोधतात. “काहीही करून माझा पुरस्कार लावा”, ” तालुका, जिंल्हा, विभाग,राज्यस्तरीय, राष्ट्रीय काहीही चालेल”, अशी विनवणीही केली जाते. मग त्या संघटनेचे लोकही ‘ठीक आहे, १५०० रुपये द्या, तुम्हाला जिल्हा गौरव पुरस्कार देतो’ असे सांगतात. एकप्रकारे हे ‘सन्मानासाठी हपापलेल्या’ लोकांची बाजारपेठ तयार झाली आहे. आणि या बाजारात बोगस पत्रकारांचा मुजोर गट दलाली करत फिरतो आहे.विशेष म्हणजे यातील बहुतांश तथाकथित पत्रकार हे ना पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले आहेत, ना त्यांनी कधी खरे पत्रकारितेचे काम केले आहे. त्यांचे संपूर्ण लक्ष ‘पत्रकार’ या ओळखीचा वापर करून फोटो काढणे, बॅनरवर नाव छापणे, आणि त्या माध्यमातून समाजात एक खोटा दरारा निर्माण करण्याकडे असतो. त्यातही आता ‘पुरस्कार वितरण’ ही नवी शाखा त्यांच्या ब्लॅकमेलिंग नेटवर्कमध्ये जोडली गेली आहे. ‘पुरस्कार मिळालेला’ व्यक्ती मग कोणत्याही क्षेत्रात ‘आपल्याला सन्मानित केले आहे’ असे सांगून अधिक सामाजिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि खरे पुरस्कार घेणारे, खरे कार्य करणारे मात्र दुय्यम ठरतात.या पार्श्वभूमीवर खर्या पत्रकार संघटनांनी, मान्यताप्राप्त माध्यमांनी आणि प्रशासनाने सजग होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बोगस संघटना कोणत्या आहेत, त्यांचे पत्रकार कोण आहेत, त्यांच्या कार्याची पारदर्शक चौकशी व्हायला हवी. पत्रकारिता ही माणसाला सन्मान मिळवून देणारी प्रक्रिया आहे, सन्मान विकायचा धंदा नाही. पुरस्कार देणे ही एक अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. पुरस्काराचा एक विशिष्ट दर्जा असतो. त्यामागे अभ्यास, तपासणी, निरीक्षण, आणि कार्याचे मूल्यमापन अपेक्षित असते. पण सध्या पाचोऱ्यात जे सुरू आहे, ते म्हणजे ‘दे पैशे आणि घे पुरस्कार’ अशा वृत्तीचा विस्तार. ही सवय समाजाच्या नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे. या बातमीच्या माध्यमातून पाचोऱ्यातील जनतेला, समाजसेवकांना, खऱ्या पत्रकारांना आणि स्थानिक प्रशासनाला साद घालण्यात येते की, अशा फसव्या, बोगस, लाजीरवाण्या आणि पत्रकारितेच्या पवित्रतेला काळिमा फासणाऱ्या संघटनांचा आणि त्यांच्या गोरखधंद्याचा निषेध करा. जर आज आपण मौन बाळगले, तर उद्या खऱ्या पत्रकार आणि पुरस्कार यांची किंमतच उरणार नाही.पुरस्कार हा स्वकर्तृत्वाने मिळायला हवा; विकत घेता येणारा नसावा. कारण खरी सन्मानाची किमया ही त्यामागील कार्यातून निर्माण होते, पैशातून नव्हे.
पाचोरा- शहरात सध्या एक वेगळ्याच स्वरूपाचा आणि समाजविघातक प्रकार मूळ धरतो आहे — तो म्हणजे स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या तथाकथित पोटभरू लोकांची एक ‘गँग’ निर्माण झालेली आहे. या गटाचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही, ना हे लोक कोठल्याही अधिकृत माध्यमाचे प्रतिनिधित्व करतात, पण त्यांच्याकडे मोबाइल, एक बनावट ‘प्रेस’ लोगो, सोशल मीडियावर काही बोगस चॅनल्स आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक WhatsApp गट आहेत. आणि या ग्रुपचाच वापर करून ही गँग सामान्य माणसांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर, राजकीय विरोधकांवर आणि इतर मतप्रदर्शन करणाऱ्या लोकांवर गलिच्छ हल्ले करण्याचा उद्योग मोठ्या बिनधास्तपणे चालवत आहे. या ग्रुपमध्ये अनेक लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने समाविष्ट केले जाते. कोणालाही ‘अॅड’ करणे, त्यांची वैयक्तिक माहिती मागवणे, आणि मग त्यांच्या विरोधात ‘कथित पोस्ट’ तयार करून सगळ्यांसमोर त्यांची बदनामी करणे, हा या गँगचा मुख्य कार्यक्रम असतो. आणि या सगळ्या प्रकारात यांचं पत्रकारितेशी कोणतंही दूरदृष्टीचं नातं नाही, उलट ‘पत्रकार’ ही ओळख या गलिच्छ हल्ल्यांना एक भेसूर स्वरूप देत आहे. जे कोणी या गटाची कार्यपद्धती, पोस्ट्स किंवा उद्देशांचा निषेध करतात, त्यांच्यावर अत्यंत अश्लील, घाणेरड्या, वैयक्तिक आणि कमी दर्जाच्या शब्दांत टीका केली जाते. त्यांना सामाजिकदृष्ट्या अपमानित करण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो. विशेष म्हणजे, ही टीका केवळ व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर वेळप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांवरसुद्धा खालच्या स्तरावरील आरोप लावले जातात.या घाणेरड्या लेखनातून कोणीही सुटत नाहीत. हे वाचून या लोकांच्या संस्कृतीची, त्यांच्यातील मानसिक निकृष्टतेची आणि पत्रकारितेच्या पवित्रतेला त्यांनी दिलेल्या तडजोडीची कल्पना येते. या प्रकारामागे एक विषारी मानसिकता कार्यरत आहे — लोकांच्या आत्मसन्मानावर हल्ला करणे, त्यांना मानसिक त्रास देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात त्यांचं चित्र विकृत करणे. हाच या तथाकथित गँगचा खरा हेतू असतो. कारण यांना कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा नाही, कोणताही वैचारिक पाया नाही आणि समाजासाठी काही करण्याची इच्छाही नाही. त्यामुळे अशा व्यक्ती जेव्हा कोणी उभं राहतं, मत मांडतं, चांगलं कार्य करतं, तेव्हा या बोगस पत्रकारांच्या गँगला असुरक्षित वाटतं. त्यातूनच ही हल्लेखोर मानसिकता उफाळून येते. या ग्रुपमधील लोकांची एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे — जेव्हा ते कोणावर हल्ला करतात, तेव्हा त्या व्यक्तीची अनुपस्थितीच त्यांचा मुख्य आधार असतो. म्हणजेच, ते पद्धतशीरपणे खात्री करून घेतात की संबंधित व्यक्ती त्या ग्रुपचा भाग नाही. जेणेकरून ती व्यक्ती उत्तरही देऊ शकणार नाही, त्याची बाजू कोण मांडणार, आणि मग या गँगला वाटते की “आपण विजय मिळवला.” पण खरं सांगायचं तर ही सगळी रणनीती म्हणजे फक्त नालायकपणाची कबुली आहे. कारण जे कोणी समोर न येता, कोणा व्यक्तीच्या अनुपस्थितीत त्याच्या विरोधात शाब्दिक गलिच्छता पसरवत असतील, ते मानसिकदृष्ट्या कमजोर आणि नीतीहीनच म्हणावे लागतील.पाचोरा शहरात अनेक चांगले, शांतपणे जीवन जगणारे, सामाजिक कार्य करणारे आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विचार करणारे लोक आहेत. परंतु असे काही लोक जेव्हा अशा गटांची पोस्ट वाचतात, तेव्हा ‘मनोरंजन’ म्हणून किंवा ‘गॉसिप’ म्हणून त्यावर हसतात हे आणखी घातक आहे. कारण यामुळे त्या गलिच्छ वृत्तीच्या लोकांना अजून उभारी मिळते. त्यांना वाटते की “आपण काहीतरी लोकांमध्ये चर्चिला जातोय, मजा येतेय.” आणि तेच पुढचे इंधन बनते, या गॅंगच्या गलिच्छ मोहिमांसाठी. पण हे विसरू नका की, आज आपण एखाद्याच्या चारित्र्यावर, कुटुंबावर किंवा प्रतिष्ठेवर हसत असाल, पण उद्या आपल्यावरही तेच होऊ शकते. कारण या बोगस गँगला ना कोणाशी बांधिलकी आहे, ना कोणती सीमा. ते फक्त ‘कुणाच्या विरोधात, कधी, कसं भांडायचं’ हे ठरवतात आणि मग त्यांच्या खालच्या पातळीच्या लेखणीचा मारा सुरू होतो. त्यामुळे ‘मनोरंजन’ म्हणून अशा पोस्ट्सकडे पाहणं म्हणजे समाजाच्या नैतिक अधःपतनाला खतपाणी घालणं आहे. अनेकदा असे लोक जे समाजात चांगली कामं करत असतात, आपले विचार, मतं नेटाने मांडतात, ते या बोगस गँगच्या टार्गेटवर असतात. पण हे लक्षात घ्यायला हवं की, जेव्हा आपण चिखलात दगड मारतो, तेव्हा थोडेफार शिंतोडे आपल्यावरही उडतातच. त्यामुळे अनेक भले लोक या चिखलात उतरणं टाळतात. ‘दृष्टिआड-सृष्टिआड’ म्हणून अशा गँगकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु या मानसिकतेतून बाहेर यायला हवं. कारण ‘चांगला सुगंध येण्यासाठी चिखल कोणी तरी साफ केला पाहिजेच.’ आज पाचोऱ्यासारख्या समृद्ध, विचारशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या उन्नत गावात जर अशी बोगस पत्रकारांची गँग कार्यरत असेल, तर तो संपूर्ण समाजासाठी धोक्याचा इशारा आहे. कारण यामध्ये ना केवळ सामाजिक समतेचा, मान-सन्मानाचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान होतो, तर पिढ्यानपिढ्याच्या मूल्यांचाही र्हास होतो. पत्रकारिता म्हणजे सत्य मांडणं, तथ्य मांडणं, जबाबदारीने संवाद साधणं. पण या तथाकथित पत्रकारांची भाषा, शैली आणि पातळी बघितली तर ते ना कोणत्याही पत्रकारी नैतिकतेच्या निकषांवर उतरत नाहीत, ना समाजासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांच्यावर केवळ उपहास नाही, तर ठोस निषेध आणि कायदेशीर पावलं उचलण्याची गरज आहे. यासाठी समाजातील सुज्ञ, सजग आणि सज्जन व्यक्तींनी एकत्र येऊन अशा गँगचं जाहीरपणे विरोध करणं, त्यांच्या ग्रुपमधून बाहेर पडणं, त्यांच्या पोस्ट्सना महत्व न देणं आणि संबंधित यंत्रणांकडे लेखी तक्रारी करणं गरजेचं आहे. तसेच, खऱ्या पत्रकारांनी, माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन अशा बोगस पत्रकारांच्या आड येणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर वावरणाऱ्या अशा टोळ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर डिजिटल गुन्ह्यांखाली कडक कारवाई झाली पाहिजे. कारण पत्रकारिता ही एक ‘स्वार्थाचा धंदा’ नसून ‘सत्याची सेवा’ आहे — आणि ही सेवा जर अशा गलिच्छ गँगकडे सोपवली गेली, तर ती सेवा उरतेच नाही.
पाचोरा – शहरात काही व्यक्तींनी पत्रकार संघटनेच्या पदांचा उपयोग करत व्यावसायिकांकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, या प्रकरणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, राकेश सुतार (रा. शिंदाड), कुंदन बेलदार (रा. भातखेंडे) आणि अन्य एका व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार आणि प्राथमिक चौकशीनंतर संबंधित आरोपींविरोधात BNS 2023 अंतर्गत कलम 308(2), 118(1), 115(2), 351(2), 352, आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अनेक दिवसा पासुन काही व्यक्तींनी पत्रकार संघटनांच्या नावाखाली कार्यक्रम, पुरस्कार, कार्यशाळा, सन्मान अशा माध्यमातून काही ठिकाणी निधी संकलनाचा प्रयत्न केल्याच्या तक्रारी होत्या शहरात यापूर्वीही काही घटनांमध्ये पत्रकार म्हणून ओळख निर्माण करून काही लोकांनी समाजमाध्यमांवर ब्रेकिंग बातम्यांच्या नावाने दबाव निर्माण केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या कारवाईनंतर व्यापारी व व्यावसायिक वर्गामध्ये दिलासा व्यक्त होत असून, पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे. पाचोरा, भडगाव, पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांत चिंता निर्माण झाली होती. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले की, “कोणतीही व्यक्ती पत्रकार असल्याचा दावा करत असल्यास त्याची अधिकृत ओळख व मान्यता तपासली जाईल. कोणीही गैरमार्गाने निधी उकळण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याविरोधात त्वरित कारवाई केली जाईल.” या घटनेबाबत पाचोरा शहरातील पत्रकार संदिप महाजन यांनी प्रतिक्रिया देतांना सांगीतले “खऱ्या पत्रकारांनी जनतेचा विश्वास मिळवलेला असतो. अशा काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण व्यवसायावर संशय निर्माण होतो, जे दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईने खरी पत्रकारिता व जनतेचा विश्वास अबाधित राहणार आहे” असे ते म्हणाले. या प्रकरणी चौकशी सुरू असून, संबंधित व्यक्तींच्या संपर्कात असलेले अन्य मंडळी, सोशल मीडिया ग्रुप्सवरील सहभाग, संभाव्य आर्थिक व्यवहार, आणि वापरलेली GP / PP याबाबत तपास सुरू आहे. ऑनलाईन व्यवहारांची तपासणीही केली जावी अशी मागणी होत आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकार व्यवसायात पारदर्शकता व विश्वास राखणे महत्त्वाचे असते. काही व्यक्ती त्या भूमिकेचा गैरवापर करत असल्यास कायद्याची कारवाई अपरिहार्य ठरते. पाचोरा पोलीस प्रशासनाने घेतलेली भूमिका ही सामाजिक जबाबदारीतून प्रेरित असून, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.